फडणवीसांकडून शरद पवारांची स्तुती   

जय-पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करतात 

मुंबई,  (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणाची कुजबूज सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची तोंडभरून स्तुती केल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार हे जय, पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात. या वयातही शरद पवार काम करतात, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची प्रशंसा केली.
 
एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात प्रकट मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी, शरद पवार यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. पण, काही गोष्टी अशाही आहेत, ज्या मी स्वीकारत नाही. पण, त्यांचे सातत्याचे मी नेहमीच कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत असतात. जय-पराजयाची तमा न बाळगता काम करत राहतात, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष असल्याचे फडणवीस म्हणाले.

अजित पवार, एकनाथ शिंदे संवादात चांगले नाहीत 

या मुलाखतीत शरद पवार यांची मुक्तकंठाने प्रशंसा करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असा चिमटा काढला. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगले आहे? याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे म्हणत त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्रुटी दाखवली आहे. अर्थात, हे दोघे या मताबाबत आपल्याला माफ करतील, असेही ते म्हणाले. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे शरद पवार गटाच्या भावी वाटचालीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
 

Related Articles